सत्यशोधक चळवळीचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान.

सत्यशोधक चळवळीचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान – डॉ. अरुण शिंदे

महात्मा जोतीराव फुले (1827-1890) हे आधुनिक भारतातील एक अत्यंत  महत्त्वाचे समाजसुधारक, तत्त्वचिंतक, शिक्षणतज्ज्ञ, शेतकऱ्यांचे कैवारी, साहित्यिक व लोकसंघटक होते. त्यांनी श्रमिक, शोषित, उपेक्षित जनसमूहांच्या जीवनवास्तवाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. वंचितांच्या उन्नतीची व शोषणमुक्तीची एक मूलगामी विचारसरणी मांडली.  त्यांनी व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात विचार-आचारामध्ये कधीही अंतर पडू दिले नाही. सामाजिक परिवर्तनासाठी विधायक, रचनात्मक कार्याचा सशक्त पर्याय दिला.  मुलामुलींच्या शिक्षणासाठी शाळांची स्थापना (1848, 1851, 1855), विधवा पुनर्विवाहास सहाय्य (1860), बालहत्या प्रतिबंधक गृह (1863), अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला करणे (1868), सावकारशाही, पुरोहितशाहीच्या शोषणाविरुध्द शेतकरी संघटन (1877) यांसारख्या त्यांच्या प्रत्येक कृतीमधून जनसामान्यांच्या मुक्तीचा निदिध्यास दिसून येतो.  तृतीय रत्न (1855), छ. शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा (1869), ब्राम्हणांचे कसब(1869), गुलामगिरी (1873), हंटर आयोगापुढील शिक्षणविषयक निवेदन 1882, शेतकऱ्याचा असूड 1883, मराठी ग्रंथकार सभेस पत्र 1885, सत्सार, इशारा (1885), सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लेखन (1889) अखंड वगैरे साहित्यांमधून कृषिजन समूहांच्या पर्यायीवाडःमयीन संस्कृतीचे बीजारोपण केले. 

          सत्यशोधक समाजाची स्थापना व स्वरूप सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 ही म. फुले यांच्या हातून घडलेली अतिशय महत्त्वाची सामाजिक घटना होती. कृषीजनांच्या दु:ख दैन्याचा, त्यास कारणीभूत घटकांचा शोध घेत अन्यायकारी व्यवस्था परिवर्तनासाठी म.फुलेंनी शूद्रातिशूद्रांचे संघटन भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये प्रथमच उभे केले.  फुलेंचे विचार, लेखन, कार्य, दृष्टी यांमधून एक सत्यशोधकीय तत्त्वज्ञान आकारास येत गेले. हा वैचारिक वारसा घेऊन समाजाच्या विविध क्ष्ोत्रांमध्ये समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या, तत्त्वनिष्ठ कृतिशील लढाऊ कार्यकर्त्यांची संघटना सत्यशोधक समाजाच्या रूपाने निर्माण झाली.  उपेक्षित, वंचित, शोषित, पीडित प्रत्येक जन सत्यशोधक समाजाच्या केंद्रस्थानी होता.  माणसाच्या पायातील गुलामगिरीच्या बेडया तोडून तो  मुक्त व्हावा व त्यांचे मनुष्यपण सर्वार्थाने विकसित व्हावे हे फुले व सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.  माणसांच्या शोषणाला जुन्या शास्त्र-पुराणांची एक तात्त्विक बैठक होती. ती उखडून टाकण्यासाठी सत्यशोधकांनी रणशिंग फुंकले.  सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश अतिशय सुस्पष्टपणे जाहीर करण्यात आला होता की, ‌‘ब्राम्हण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे ते शुद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत. यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यांस मुक्त करण्याकरिता काही सुज्ञ शुद्र मंडळीनी हा समाज स्थापन केला.  या समाजात राजकीय विषयावर बोलणे वर्ज्य आहे’. यावरुन दिसून येते की, कृषिजनसमूहांची धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता, शोषणास नकार, चिकित्सा, बुध्दिवाद, मानवी हक्क व अधिकारांची प्राप्ती, शिक्षण, अस्मिता जागृती आणि राजकारणविरहित काम हे सत्यशोधक समाजाचे प्रारंभिक ध्येयधोरण होते.  24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक                                           समाजाच्या स्थापनेवेळी महाराष्ट्राच्या निरनिराळया केंद्रातील साठ कार्यकर्ते हजर होते. 

          लोकांच्या सक्रीय सहभागाने            समाजाचे काम उत्तरोत्तर व्यापक व विकसित होत गेले. भिक्षुकशाही, पुरोहितशाहीच्या जोखडातून शूद्रांतिशूद्रांची  मुक्तता, सावकारशाहीविरुध्दचा लढा, शेतकरी संघटन, कामगार संघटना, सत्यशोधकी विवाह, धार्मिक बाबतीतील स्वावलंबन प्राथमिक शिक्षणाची मागणी व प्रसार, सत्यशोधकीय साहित्य, नियतकालिके, प्रचारक, परिषदा, सभा, सत्यशोधक जलसे अशा अनेक माध्यमातून सत्यशोधक समाजाला एका लोकआंदोलनाचे रूप प्राप्त झाले.  शहरी व ग्रामीण भागातील कष्टकरी जनसमूहांचा सहभाग मुख्यत्वे होता.  यांमधील मोठा वर्ग निरक्षर होता.  चळवळीचे तत्त्वज्ञान व कृतिकार्यक्रम यांच्यावरील निष्ठा व सामाजिक परिवर्तनाची आच यापोटी तो उत्स्फूर्तपणे सत्यशोधक चळवळीमध्ये सामील झाला होता.  सत्यशोधक समाजाचे काम वेगवेगळया भागात विखुरलेल्या कार्यकर्त्यामार्फत प्रामुख्याने चालत असे.  सत्यशोधक समाजाची शिस्तबध्द अशी संघटनात्मक उतरंड फारशी नव्हती.  म. फुलेंचे विचार कार्य, साहित्य, प्रमुख सत्यशोधक नेत्यांचे मार्गदर्शन, फिरत्या प्रचारकांचा उपदेश, नियतकालिकांमधील लेखन, परिषदा यांमधून मांडलेल्या विचारसूत्रांवर सत्यशोधक कार्यकर्ते लोकजागृती व नवनिर्माणाचे काम करीत.

               सत्यशोधक समाजाचे सभासद होताना सर्व मानव-प्राण्याशी बंधुभावाने वागण्याची, धार्मिक विधीतून मध्यस्थांच्या उच्चाटनाची आणि मुला-  मुलींना शिक्षण देण्याची शपथ घ्यावी लागे. समाजाचे सभासद होताना तळी उचलावी’ लागे. कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीला समाजाचे सभासद होता येत असे.  शिक्षण, पुरोहितशाहीचे स्वरूप, जातिव्यवस्था, मूर्तिपूजा, कर्मकांडे, दारूबंदी, मागासलेल्या वर्गाची स्थिती, सावकारशाही अशा विषयानुरोधाने सभेत चर्चा होई. शोष्ाितांच्या भौतिक वृध्दीच्या दृष्टीने विचारविनिमय होत असे.

  सत्यशोधक समाजाची तत्त्वप्रणाली

          1911 साली सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन करणारी परिषद पुण्यास झाली. त्यामध्ये पुढील तत्त्वे ठरविण्यात आली. 1. सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत व देव त्यांचा आई-बाप आहे. 2. आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थांची जरुरी नसते त्याप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यास पुरोहित अगर गुरू यांची आवश्यकता नसते. 3. वरील तत्त्वे कबूल असल्यास कोणालाही सभासद होता येते.

          सत्यशोधक समाज मूलत: धार्मिक व सामाजिक पुनर्रचनेची चळवळ होती. मानवतावाद, व्यक्तिस्वातंत्र्य आणि बुध्दिप्रामाण्य यासारख्या पुरोगामी मूल्यांवर आधारित ही चळवळ होती.  जोतीरावांचे विचार हे सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान होते.  सर्व माणसे समान आहेत. त्यांच्यामध्ये कोणत्याही कारणाने केले जाणारे भेद कृत्रिम, खोटे आहेत अशी त्यांची धारणा होती. समता, बंधुता, स्वातंत्र्य व मानवी प्रतिष्ठा या मूल्यांच्या पायावर नवा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रस्थापित वर्णजातिप्रधान समाजव्यवस्था व कर्मठ पक्षपाती धर्मसंस्था यांची परखड चिकित्सा केली. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, बाबाप्रामाण्य वगैरे प्रामाण्यवादाला नकार दिला. हिंदू धर्मातील वेद, श्रुती, स्मृती, पुराणे आदींमधील तत्त्वज्ञानाला व आशयाला तर्कशुध्द आव्हान दिले.

          या देशामध्ये शेकडो वर्षापासून चालत आलेला प्रामाण्यवादच मानसिक गुलामगिरीचे मूळ आहे हे ओळखून त्यावरच घाव घातला. धर्माधर्मातील तत्त्वे अभ्यासताना देखील मानवी बुध्दीचा निकष महत्त्वाचा मानला. बुध्दिवाद व इहवादाचा जोरदार आग्रह धरला. सत्यशोधक समाजाने सुरुवातीच्या काळात पुरोहितशाहीच्या विरोधात लढा उभारला. ब्राम्हणी धर्मव्यवस्थेने वर्णजातिव्यवस्थेची उतरंड निर्माण करून उच्चनीचभेद, विषमता व शोषण यांची एक जन्मसिध्द अपरिवर्तनीय संरचना अस्तित्वात आणली. तिने ज्ञानाची दारे शूद्रातिशूद्रांसाठी बंद केली. उच्चवर्णीयांचे वर्चस्व व कनिष्ठ वर्णीयांचे दास्यत्व अबाधित राख्ाण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. भारताचा सामाजिक व धार्मिक इतिहास हा सामान्य श्रमिक कृषिजनसमूहांच्या नागवणुकीचा इतिहास आहे.  या सर्व अमानुष प्रकारांना पायबंद घालण्यासाठी सत्यशोधक समाजाने विद्रोह पुकारला.  सामाजिक व धार्मिक क्षेत्रांतील सर्व तऱ्हेच्या विषमतेस व शोषणास त्यांनी नकार दिला. धर्मसंस्थेमध्ये दलालाप्रमाणे कार्यरत असणारी पुरोहितशाहीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सत्यशोधकांनी ईश्वर व भक्त यांच्यामधील मध्यस्थांच्या उच्चाटनाची जाहीर भूमिका घेतली व धर्मसंस्थेतील एका प्रबळ शोषक सत्तेला खिळखिळे केले स्वत:चे धार्मिक विधी स्वत: करण्याचा त्यांचा विचार धर्मसंस्थेच्या जोखडातून मुक्ततेचा व धर्मापलीकडे जाण्याची दृष्टी देणारा अत्यंत प्रगत बुध्दिवादी विचार होता.  हजारो वर्षापासून धर्मसंस्थेचे वर्चस्व, भय, पुरोहितशाहीची दादागिरी, पारंपरिक मानसिकता, देवदेैववाद वगैरेमध्ये आरपार बुडालेल्या खेडूत, निरक्षर, गरीब, अगतिक जनसमूहांना धर्मसंस्थेच्या गुलामगिरीविरुध्द लढण्यासाठी उभे करण्याचे अशक्यप्राय काम सत्यशोधकांनी शक्य करून दाखवले.