धर्मांध शक्तीविरोधात लढण्याचे वैचारिक आयुधधर्मांधता.

धर्मांध शक्तीविरोधात लढण्याचे वैचारिक आयुधधर्मांधता – राजा कांदळकर

      ‘राज्यसंस्थेवरील घोर संकट’ हे समाजवादी नेते मधु लिमये यांचं पुस्तक सध्या चर्चेत आहे. हे पुस्तक मूळ इंग्रजीत आहे. त्याचा मराठी अनुवाद वासंती दामले यांनी केला आहे. या पुस्तकाचे संपादन अमरेंद्र धनेश्वर आणि अनिरुद्ध लिमये यांनी केलं, आहे. केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मुंबई आणि साधना प्रकाशन, पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. मधु लिमये हे भारतातील महत्त्वाचे प्रभावशाली समाजवादी नेते होते. समाजवादी चळवळीत त्यांनी डॉ. राम मनोहर लोहिया आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं.

          महाराष्ट्रात समाजवादी नेते एसेम जोशी आणि नानासाहेब गोरे यांच्यासोबत त्यांनी समाजवादी चळवळीला महत्त्वाचे योगदान दिलं आहे. धर्मांधता राज्यसंस्थेवरील घोर संकट या पुस्तकात मधु लिमये यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची मांडणी केली आहे. या पुस्तकाला प्रस्तावनाही मधु लिमये यांनीच लिहिली आहे. पुस्तकात मनोगत अमरेंद्र धनेश्वर आणि अनिरुद्ध लिमये यांचं आहे. या पुस्तकांमध्ये चार-पाच महत्त्वाची प्रकरणे आहेत. त्यात भारतातील वाढत्या धार्मिक कट्टरतेचा लेखाजोखा घेतलेला आहे. विविध संस्कृतीमधील संघर्ष आणि भारत असा तुलनात्मक लेखन धांडोळा आहे. तो पुस्तकात महत्त्वाचा आहे.  संघ परिवार आणि गोळवळकर गुरुजींची विचारसरणी यावर या पुस्तकात मधु लिमये यांनी सविस्तर मांडणी केली आहे.

          धर्माच्या दुरुपयोगाविरुद्ध कायदे कानून करणे किती उपयुक्त आहे? असा एक महत्त्वाचा लेख या पुस्तकात आहे. त्याचप्रमाणे तथाकथित धर्मयुद्ध हा लेखही मराठी वाचकांना जगातील धर्मयुद्धाबद्दल माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरेल. या पुस्तकात एक लक्ष वेधून घेणारे परिशिष्ट आहे. ‘गर्वसे कहो’ अशा नावाने ते आहे. यामध्ये आपल्याला आपला धर्म आणि देशाविषयी गर्व वाटतो, अशा घटना दिल्यात. त्या खरोखर गर्व वाटण्याजोग्या आहेत का? असा प्रश्न पडावा अशी मार्मिक टिप्पणी मधु लिमये यांनी केलेली आहे.                     

          अडीचशे रुपयांचे हे पुस्तक आहे पाने 224 आहेत. मधू लिमये यांची भाषा अत्यंत ओघवती, रसाळ आहे. कधी तिरकस, कधी ज्ञान समृद्ध करणारी अशी आहे. मधु लिमये पुस्तकात म्हणतात, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद जोपर्यंत स्वतःला सुसंस्कृत आणि विचार समृद्ध करत नाही, बनवत नाही आणि समाजातील वंचित जातींच्या सामाजिक जागृतीला आपल्या अंगी मुरवत तिचे रूपांतर क्रांतिकारक शक्तीत करत नाही तोपर्यंत हिंदू सांप्रदायिक विचारांच्या वाढत्या उधानाला रोखणं अवघड आहे.

          हिंदू कडवेपणाला आणि मुस्लिम मूलतत्त्ववादाला रोखू शकेल असा एक मार्ग म्हणजे मुस्लीम समाजाचे जीवन धर्मनिरपेक्ष बनवणे. मुसलमान नेत्यांनी जर आपल्या समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक गरजांवर लक्ष केंद्रित केलं. समाजाला विकासाभिमुख केलं. तसेच त्यांच्या अलगतेवर जोर दिला नाही, तर आणि तरच केवळ    मुस्लीम मूलतत्त्वावरील एवढेच नव्हे, तर हिंदू सांप्रदायिक प्रचारकांच्या खात्यातील बहुतेक अश्रे निकामी होतील अशी     मांडणी मधु लिमये यांनी केलेली आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये मधु लिमये यांनी 26 जानेवारी 1994 रोजी लिहिले आहे. ते असं – संविधानिक सुनियोजित राज्यव्यवस्था शाबूत ठेवायची असेल, तिच्यावर घातला जाणारा सांप्रदायिक घाला रोखायचा असेल तर भाजपाच्या मनसुब्याला उधळून लावलं पाहेिजे. ही जबाबदारी सर्व समंजस समन्वयी आणि सहिष्णू शक्तींनी  सामुदायिकरित्या पार पाडली पाहिजे. साथी मधु लिमये यांची नुकतीच जन्मशताब्दी झाली. या निमित्ताने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. सर्वांनी वाचावे असं हे पुस्तक आहे. आकर्षक मुखपृष्ठ आणि दर्जेदार निर्मिती हे या पुस्तकाचं वैशिष्ट्ये वाचकांना नक्की जाणवेल.            

पुस्तकासाठी संपर्क

          – साधना प्रकाशन,

          दूरध्वनी : 02224459635