
महाराष्ट्रात धार्मिक ध्रुवीकरणाचा घातक प्रयत्न.
– प्रमोद मुजुमदार (समन्वयक,सलोखा संपर्क गट)
या वर्षाच्या सरुवातीपासून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत घातक असे धार्मिक ध्रुवीकरणाची मोहीम हिंदुत्ववादी संघटनांनी सुरू केली. त्यामागे निश्चित योजना आहे. ट्प्प्याटप्प्याने आणि सातत्याने ही मोहीम राबवली जात आहे.
या मोहिमेद्वारे महाराष्ट्रातील मुस्लीम अल्पसंख्य समाजाला लक्ष्य केले गेले आहे. प्रथम कोल्हापूर नंतर सातारा जिल्हा अशी ही मोहीम सुरू आहे. त्या माहिमेत एक निश्चित सूत्र आहे. सुरुवातीला दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील मध्यम आकाराच्या शहरांमध्ये ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ चे आयोजन केले गेले. लव जिहाद आणि धर्मांतराचे निमित्त पुढे करून लहान मोठ्या गावात तणावाचे वातावरण निर्माण करण्यात आले. काही ठिकाणी हिंदूधर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट लिहिल्या म्हणून संताप व्यक्त केला गेला. एकंदरीत महाराष्ट्रात ‘हिंदू विरुद्ध मुस्लीम’ असे विद्वेषाचे वातावरण सातत्याने पसरत ठेवायचे असे धोरण आहे. यामागे एक निश्चित राजकीय उद्दिष्ट आहे. सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी मुस्लीम समाजाविरोधी घटना घडवल्या गेल्या. अनेक ठिकाणी गावागावात बंद आयोजित करण्यात आले काही ठिकाणी त्याचे एक टोक कोल्हापूर जिल्ह्यात सात जून रोजी गाठले गेले सात जून रोजी मुस्लीम समाजातील एका विद्यार्थ्याने हिंदूधर्मियांच्या भावना दुखावणारी फेसबुक पोस्ट टाकली, असा आरोप करत कोल्हापुरात हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या तरुणांच्या टोळीने मुस्लीम समाजावर एकतर्फी हल्ला केला. त्यांची दुकाने जाळण्यात आली. घरादारांची मोडतोड करण्यात आली. जुलै ऑगस्ट मध्ये अशाच प्रकारच्या मुस्लीम विरोधी घटना सातारा जिल्ह्यात दूरदूरच्या गावात घडल्याचे पुढे आले आहे. या घटनांमध्ये मुस्लीम तरुणांची फेसबुक अकाउंट्स हॅक करून या अकाउंट वर हिंदूंच्या भावना भडकतील अशा पद्धतीच्या खोट्या पोस्ट वितरीत करण्यात आल्या. पोस्ट ज्या अकाउंट वरून आल्या तो मोबाईल जवळ बाळगणाऱ्या मुस्लीम मुलाला आरोपी ठरवण्यात आले. रात्री उशिरा हिंदुत्ववादी म्हणवणारे तरुणांचे गट अशा मुलाचा माग काढत दूरच्या खेड्यांमध्ये जाऊन या मुस्लीम मुलांना बेदम मारहाण करत. त्याच वेळेस सातारा येथे पोलीस स्टेशनमध्ये या मुलांविरुद्ध तक्रारी दाखल करत. समाजात जातीय धार्मिक तणाव वाढू नये यासाठी पोलीस सदर मुस्लीम मुलाला ताब्यात घेतात. अनेकदा असे मोबाईल हॅण्ड्सेट्स आरोपी मुलाच्या आईचे, मावशीचे वडिलांचे किंवा इतर नातेवाईकांचे असल्याचे समोर येते. अशा वेळेस या मुलाच्या आई, वडील किंवा मावशीलाही अटक केली जाई. अशा घटनांचे अतिशय नकारात्मक परिणाम मुस्लीम समाजावर घडत आहेत. लहान गावांमध्ये मुस्लीम समाज अतिशय थोड्या संख्येने आहे. गावातील एखाद्या मुस्लीम मुलाला अशा पद्धतीने मारहाण झाली, पोलिसांनी अटक केली तर गावातील इतर मुस्लीम कुटुंब घाबरून जातात.अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या गावातील मुस्लीम आपापली गावे सोडून लांब जातात. मुस्लीम समाज अतिशय वेगाने एकटा पडत आहे. दहशतीच्या छायेखाली वावरत आहे. जुलै ऑगस्ट या दोन महिन्यांत सातारा जिल्ह्यात अशा प्रकारच्या एकूण 15 घटना नोंदल्या गेल्या आहेत. या घटनांमध्ये शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकणारी मुले आरोपी ठरवण्यात आली आहेत. बऱ्याच केसेसमध्ये ही आरोपी मुले अल्पवयीन असल्याचे पुढे आले. त्यामुळे या मुलांना बालसुधारगृहात पाठवले जाते. अर्थातच, अशा घटनांमुळे या मुलांची शाळा बुडते. शाळेत या मुलांना बरोबरचे विद्यार्थी बहिष्कृततेची वागणूक देतात. त्यांच्या कुटुंबाची वाताहात होत आहे. या सर्व घटनांचे सातारा जिल्ह्यात टोक गाठले गेले ते दहा सप्टेंबर रोजी पुसेसावळी येथे. हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या आक्रमक तरुणांच्या टोळीने गावात घुसून गावातील मशिदीवर हल्ला केला. मशिदीत असलेल्या मुस्लीम लोकांना बेदम मारहाण केली. या माराहाणीत एका मुस्लीम तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर इतरही अनेक तरुण गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर पुसेसावळी येथील मुसलमान समाजातील लोकांच्या घरांना आणि दुकानांना आगी लावण्यात आल्या. दुचाकी आणि चारचाकी वाहने जाळण्यात आली. एकूण हा एकतर्फी हल्ला होता. वरील सर्व घटनांचा सलोखा संपर्क गट आणि राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांतर्फे पाठपुरावा करून माहिती घेण्यात आली. या घटनांमध्ये अडकलेल्या मुस्लीम कुटुंबीयांना मदत करण्यात आली. वरील घटनांसोबतच महाराष्ट्रात गोमांस वाहतुकीचे आणि अप्रत्यक्षपणे गो-हत्येचे आरोप करत निरपराध मुस्लीम नागरिकांवर हल्ले करण्याच्याही घटना घडताहेत.मे आणि जून या दोन महिन्यांत महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात गोमांस वाहतुकीचा ठपका ठेवत दोन मुस्लीम तरुणांचे मॉबलिंचीग करण्यात आले. तर याच घटनांमध्ये आणखी दोन मुस्लीम तरुण गंभीर जखमी झाले होते. या घटनांची फारशी चर्चा प्रसार माध्यमांमध्ये झाली नाही. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राष्ट्र सेवा दल आणि सलोखा संपर्क गटातर्फे मोहीम काढण्यात आली होती. या पैकी एक घटना नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे घडली होती. म्हशी आणि रेड्याचे मांस वाहून नेणाऱ्या एका टेम्पोला घोटीजवळ टोल नाक्याच्या आधी काही अंतरावर बजरंगदलाच्या एका टोळक्याने अडवले. टेम्पोत गायीचे मांस आहे असा आरोप करत ड्रायव्हर आणि त्याच्या बरोबरच्या सहाय्यकाला खाली उतरण्यास भाग पाडण्यात आले. (या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे, की महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी आहे. याचा अर्थ गाय आणि बैल यांची हत्या करण्यावर बंदी आहे. म्हशी आणि रेड्याच्या हत्येला आणि मांस विक्रीवर बंदी नाही.किंबहुना म्हशी आणि रेड्यांच्या मांसासाठी राज्यात अनेक ठिकाणी सरकारी परवाना असलेले खाजगी कत्तलखाने आहेत.) या टेम्पोतील मुस्लीम तरुणांजवळची चाळीस पन्नास हजार रुपयांची रोकड काढून घेण्यात आली. मोबाईल हिसकावून घेण्यात आले. आणखी पैशाची मागणी करण्यात आली.त्या तरुणांजवळ पैसे नव्हते. त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्या दोघांना बजरंग दलाच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ते दोघे मेले आहेत, असे समजून त्यांना जंगलात टाकून देण्यात आले. त्यांच्या पैकी एक जण चुकून वाचला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या मॉबलिंचिंगमधून वाचलेल्या नासिर कुरेशीला कुर्ला येथे भेटल्यावर त्याची सविस्तर माहिती मिळाली. कुर्ला कुरेशी नगरमध्ये अनेक लोक म्हशी आणि रेड्यांच्या मांसचा व्यापार अनेक लोक पारंपरिकरित्या करतात. महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यापासून अशाप्रकारे गोमासांचा मुद्दा पुढे करून ट्रक टेम्पो अडवून तरुण ड्रायव्हर आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांना मारहाण करणे, खंडणी वसुली आणि टेम्पो जाळणे असे प्रकार बजरंगदलाच्या टोळी तर्फे संघटित गुन्हेगारी स्वरूपात केले गेले आहेत. असे अनेक अनुभव तेथील लोकांनी सांगितले.या घटनांची फारशी नोंदही घेतली जात नाही. अशाच प्रकारची दुसरी मॉबलिंचिंगची घटना नाशिक जिल्ह्यात इगतपुरी जवळ घडली. या घटनेत मांस वाहतूक करणाऱ्या टेम्पोतील ड्रायव्हर आणि त्याच्या बरोबरच्या इसमाला खाली खेचण्यात आले. ड्रायव्हिंग करत असलेला लुकमान अन्सारी हा तरुण त्या बजरंगदलाच्या टोळक्यांच्या हातात सापडला. दुसरा तरुण जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाला. लुकमान अन्सारीला बेदम मारून त्याचे प्रेत दरीत टाकून देण्यात आले.अन्सारी हा या टेम्पोबरोबर ड्रायव्हर म्हणून गेला होता. त्याच्या बरोबर असलेला दुसरा तरुण टेम्पो मालकाचा मुलगा होता. अन्सारी कुटुंब म्हणजे मुस्लीम उत्तर भारतातील मुस्लीम समाजातील दलित जातीतील आहे. टेम्पो भिवंडी जवळील पडघा येथील होता. या मॉबलिचिंग घटनेत वाचलेला मुलगा घरी आल्यावर लुकमान बजरंगदलाच्या टोळीच्या हाती सापडल्याचे समजले. त्यानंतर घरच्या लोकांनी शोधाशोध केल्यावर लुकमानचे प्रेत तीन दिवसांनी दरीत सापडले.या दोन्ही घटनातील जखमी तरुणांच्या कुटुंबीयांना, तसेच मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना भेटून या प्रकाराची माहिती घेण्यात आली. तसेच या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली राष्ट्र सेवा दलातर्फे राष्ट्रीय महासचिव अबिद भाई खान, संदेश भंडारे, प्रमोद मुजुमदार आणि सलोखा संपर्क गटातर्फे दिलीप जोशी ठाणे, रीजनिश कोंडविलकर, मुंबई यांनी पुढाकार घेतला होता. या सर्व घटना म्हणजे महाराष्ट्रात गो-हत्या बंदीच्या धोरणाचा गैरफायदा घेत मुस्लीम विरोधी हिंसाचार घडवण्याचा प्रकार आहे. या हिंसाचारामध्ये आज मुस्लीम समाजातील केवळ गोरगरीब तरुण भरडले जात आहेत. एकूणच महाराष्ट्रात ‘हिंदू विरुद्ध मुस्लिम’ असे ध्रुवीकरण तयार केले जात आहे. मुस्लीम समाजाचे विकृत चित्र उभे केले जात आहे. फेसबुक पोस्ट आणि समाज माध्यमातील विविध प्रसार माध्यमांचा उपयोग करून मुस्लीम समाजाला बदनाम केले जात आहे. दोषी ठरविले जात आहे. हिंसेचे लक्ष्य करण्यात येत आहे. रोजचे सर्वसामान्य जीवन जगणे हळूहळू मुस्लीम समाजाला अशक्य होत आहे. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाला उद्ध्वस्त करण्याचे हे षडयंत्र आहे. अशा घटना सातत्याने घडवून संपूर्ण समाजात धर्मांचे विष पेरायचे असा त्यामागे थेट उद्देश आहे याचा उपयोग 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी करता येईल, असे अतिशय घातक धोरण सत्ताधारी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आखले आहे. पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असल्यामुळे अशा घटनांमध्ये सापडलेल्या मुस्लीम नागरिकांना तातडीने मदत मिळणे आणि योग्य ती चौकशी होणे अवघड होत आहे. अशावेळी राष्ट्र सेवा दलाच्या मूळ धर्मनिरपेक्षता आणि समतेच्या भूमिकेशी आपली निष्ठा राखत राज्यातील अल्पसंख्या मुस्लीम समाजाला आधार देणे आणि हिंसक घटनांच्या प्रसंगी प्रत्यक्ष मदतीला उभे राहणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.